बाहुबली व धानम्मा मंदिरातील चोरीचा तपास उलगडला : पंचधातूच्या ८ मुर्ती हस्तगत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलपुर : सोलापूर शहर गुन्हे शाखेने केवळ १२ तासांच्या आत दोन मंदिरांतील चोरी उघडकीस आणत तिघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे. जैन समाजाचे बाहुबली मंदिर आणि धानम्मा देवी मंदिर येथून चोरट्यांनी पंचधातूच्या मुर्ती आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता.
ही धाडसी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने केली. दि. ४ ते ५ ऑक्टोबर दरम्यान विजापूर रोडवरील बाहुबली जैन मंदिरात पंचधातूच्या विविध मुर्ती आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेण्यात आला होता.
त्यानंतर काही अंतरावरच असलेल्या धानम्मा देवी मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे सहा हजार रुपयांची चोरी करण्यात आली होती. घटनेनंतर गुन्हे शाखेने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सराईत चोर आकाश सुरेश पवार (२६), अशपाक मौला शेख (२७) आणि करण उर्फ करण्या केंगार (रा. दमाणी नगर) यांची ओळख पटवून सापळा रचण्यात आला.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मोदी रेल्वे बोगदा परिसरात सापळा लावून आरोपींना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींकडून पद्मावती देवी, बाहुबली, आदिनाथ, पार्श्वनाथ, अनंतनाथ, शांतीनाथ आणि २४ तिर्थंकरांच्या अशा एकूण ८ पंचधातूच्या मुर्ती तसेच रोख २००० रुपये असा १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे, उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक
बाळासाहेब काळे तसेच सायबर शाखेतील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली. या जलदगती व कौशल्यपूर्ण तपासामुळे सोलापूर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.















