“एक हात मदतीचा” संकल्पनेतून गोसेवा : श्रमण सेवासंघ व स्व-पर कल्याण समूहाच्या संयुक्त प्रयत्नातून मोठा उपक्रम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : मुंबईस्थित अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन श्रमण सेवासंघाच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्ष श्री सुजित राजकुमार खोलापुरे, पनवेल यांच्या प्रेरणेतून अलीकडील दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी जवळील पूरग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गोसेवा करण्यात आली आहे. हा उपक्रम स्व-पर कल्याण समूह, बंगलोर यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.
पूरामुळे गोधनांसाठी चारा संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर श्रमण सेवासंघ आणि स्व-पर कल्याण समूहाचे सेवाभावी कार्यकर्ते कपिलापुरी, रिथोरे आणि आवारपिंपरी या भागांमध्ये चारा वितरणासाठी पुढे आले.
कपिलापुरी : २५० पशुसाठी ८ टन चारा, आवरपिंपरी : ६० पशुसाठी ३ टन चारा, रिथोरे : ४ टन चारा. या उपक्रमासाठी वडणेरच्या विद्याप्रणम्य गौशाळेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. एकूण पंधरा टन चारा, जवळपास एक लाख पंधरा हजार रुपयांचे सामाजिक कार्य करण्यात आले.
कारंजा, अमरावती, पुणे, नागपूर, जिंतूर, मुंबई आणि पनवेल येथील श्रमण सेवासंघाचे अनेक कार्यकर्ते आर्थिक आणि साहाय्यकारी दृष्टिकोनातून या उपक्रमास पुढाकार घेण्यासाठी सहभागी झाले.
सर्व दानदाते आणि स्वयंसेवकांनी “जीव मात्रां प्रति करुणा हीच खरी साधना” या भावनेला प्रत्यक्ष रूप दिले.
भगवान महावीर यांचे “जीओ और जीने दो” हे संदेश प्रत्यक्ष जीवनात उतरवून हा उपक्रम पूर्ण झाला. निर्यापक श्रमण श्री वीरसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कीट आणि छात्रवृत्ती वितरणाचा उपक्रम येत्या पंधरा ते वीस दिवसांत राबविण्यात येईल.
या उपक्रमाचे स्थानिक स्तरावर सर्वत्र कौतुक होत असून, “एक हात मदतीचा” संकल्पनेतून मानवतेसह जीवदयेचा संदेश प्रभावीपणे समाजात पोहोचला आहे.
जीवदया हीच खरी जिनसेवा आहे. संकटाच्या काळात मुक पशुंच्या प्रती करुणाभाव दाखवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. – सुजित खोलापुरे
