कसबा सार्वजनिक महिला मंडळाचा १५ वा वर्धापन दिन : नृत्य, स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव रंगतदार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भूम शहरातील कसबा विभागातील कसबा सार्वजनिक महिला मंडळाच्या वतीने नवरात्र स्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येत नवरात्र उत्सव साजरा केला. यंदा या मंडळाच्या नवरात्र उत्सवाला १५ वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्ताने सांस्कृतिक, सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांनी उत्सव अधिकच रंगतदार बनला.
महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये वेशभूषा स्पर्धा, भारुड, कॉमेडी कार्यक्रम, महिला डान्स स्पर्धा, तसेच बचत गटांविषयी माहिती देणारे जनजागृती नाट्य या उपक्रमांचा समावेश होता.
लहान मुलांसाठी हस्ताक्षर स्पर्धा, पाढे पाठांतर (२ ते ३०), धावणे, बेडूक उडी, लिंबू-चमचा, नृत्य व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. लहान मुलांच्या स्पर्धांचे आयोजन अमृता वैद्य यांनी केले. दररोज सायंकाळी महिलांचा गरबा खेळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, सुस्मिता डगळे यांनी या कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले.
स्पर्धांचे परीक्षण म्हणून डॉ. ज्योती डुंगरवाल यांनी केले. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला एकत्र येऊन गरबा खेळतात. त्यानंतर दुधाचा प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून आम्ही महिलांना व मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा आणि समाजाला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो. – संयोगिता गाढवे, माजी नगराध्यक्षा, भूम
