४० हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केली कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विक्री केलेल्या जमिनीची नोंद मंजुरीसाठी ५० हजारांची लाच मागून ४० हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.
राजेंद्र भगवान वाघमारे (वय ५३, रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे लाच घेणाऱ्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची नोंद संबंधित तलाठी यांनी धरल्यानंतर ती नोंद मंजुरीकरीता मंडल अधिकारी वाघमारे यांच्याकडे पाठवली होती.
त्यांनी ती नोंद फेटाळल्याचे सांगून मंजुरीसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ९ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली. पडताळणी दरम्यान तडजोडीनंतर वाघमारे यांनी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पंढरपूर येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील रायगड भवन येथे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, सुहास हट्टेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना वाघमारे यांना पकडण्यात आले. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस आयुक्त अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते पुढील तपास करीत आहेत.
