महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पाषाण भागातील एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल एक कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका व्यावसायिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक पाषाण भागात राहतात. सायबर चोरट्यांनी मे महिन्यात त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठविला होता. शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक काम करणाऱ्या संस्थेतील प्रतिनिधी असल्याचे भासवून चोरट्यांनी संपर्क साधला होता.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून व्यावसायिकाला सोशल मीडियातील एका समूहात सामील करून घेतले. गुंतवणुकीसंदर्भातील विविध योजनांची माहिती देण्यात आली.
त्यानंतर व्यावसायिकाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी परतावा मिळाल्याचा भास निर्माण केला, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा केली नव्हती. परतावा मिळाल्याचा विश्वास बसल्याने व्यावसायिकाने आणखी रक्कम गुंतविली.
गेल्या चार महिन्यांत त्यांनी सायबर चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर चोरट्यांनी परतावा दिला नाही. पैसे परत मिळविण्यासाठी त्यांनी संपर्क साधला असता मोबाईल बंद आढळला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देवकाते करत आहेत.
