सामाजिक उद्योजकतेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल जागतिक सन्मान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. राजेश शहा यांना अमेरिकेतील नामांकित बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठ, यूएसए कडून सामाजिक उद्योजकतेतील मानद डि.लीट (Doctor of Letters in Business Management and Social Work) विथ गोल्ड मेडल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा दिल्ली येथे 12 ऑक्टोबर रोजी पार पडला.
या प्रसंगी विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी बोलताना म्हटले की, “डॉ. राजेश शहा यांचे सामाजिक उद्योजकतेतील योगदान प्रेरणादायी आहे. समाजातील सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम प्रभावी व नाविन्यपूर्ण आहेत. हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ठ कार्याची दखल आहे.”
व्यवसायात प्रचंड यश मिळवूनही डॉ. शहा हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून पुण्यात भारताचे पहिलेच भव्य दिव्य ‘गुजरात भवन – जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात आले आहे.
याच परिसरात त्यांनी चार वर्षांपूर्वी PGKM विद्याधाम ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, बॅगलेस व डे स्कूलची संकल्पना असलेली शिक्षणसंस्था सुरू केली. तसेच त्यांच्या मूळगावी पेढामली (ता. विजापूर, जि. मेहसाणा – गुजरात) येथे आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी ‘कंचन-हिरा आयुर्वेदिक हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर’ हे 60 बेड्सचे अत्याधुनिक रुग्णालय उभारले असून, येथे अत्यल्प किंवा मोफत दरात उपचार दिले जातात.
डॉ. शहा यांच्या सार्वजनिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (Ph.D.) पदवीने गौरविले आहे. तसेच त्यांना फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस करीता देण्यात येणारा जमनालाल बजाज पुरस्कार तिनवेळा प्राप्त झाला आहे.
याशिवाय समाजरत्न, आदर्श व्यापारी, जीवनगौरव, व्यापार भूषण, राष्ट्रीय ऐकता, कर्मवीर, बेस्ट बिझनेसमन असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या “लाडू-चिवडा” या लोकप्रिय उपक्रमाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदले गेले आहे.
डॉ. राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेचे चेअरमन आहेत. तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून, श्री पूना गुजराती बंधु समाज या 110 वर्षांपासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.
ते पुना मर्चंट चेंबर चे सुवर्णमहोत्सवी वर्षातील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (FAM) चे गेल्या 25 वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
तसेच ते जनसेवा फाउंडेशन चे खजिनदार असून, विविध सामाजिक संस्थांमध्येही सक्रिय योगदान देतात. डॉ. राजेश शहा यांचा प्रवास हा व्यवसायातील यश आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम आहे.
त्यांना प्राप्त झालेला बर्लिंग्टन स्टेट विद्यापीठाचा डि.लीट सन्मान हा त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा आणि समाजसेवेतील निष्ठेचा गौरव आहे.
