प्रख्यात कलाकार रोहित रॉय व ठाकूर अनुप सिंग यांची विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी भेट
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधन कॅम्पसमध्ये प्रख्यात अभिनेता रोहित रॉय आणि ठाकूर अनुप सिंग यांच्या उपस्थितीत एक प्रेरणादायी संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (SIPA) आणि सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊस (SPH) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
सायबर क्राईमवर आधारित आगामी चित्रपट ‘कंट्रोल’ च्या निमित्ताने मुख्य कलाकार रोहित रॉय व ठाकूर अनुप सिंग यांनी सुर्यदत्त संस्थेतील विद्यार्थ्यांशी खुल्या संवादाचा अनुभव घेतला. हा कार्यक्रम सुर्यदत्त बन्सीरत्न ऑडिटोरियम, बावधन येथे आयोजित करण्यात आला, जिथे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.कार्यक्रमादरम्यान, कलाकारांनी चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया, अभिनय आणि सर्जनशील यांसारख्या विषयांवर माहिती दिली.
या प्रसंगी मिस अर्थ इंडिया २०२५ कोमल चौधरी यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या माध्यमातून वैयक्तिक प्रगती व यश मिळविण्याचे मार्गदर्शन केले.
रोहित रॉय यांनी काही कथांद्वारे जीवनातील अनुभव व प्रेरणा स्पष्ट केली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, क्षेत्र तुमच्या आवडीचं निवडा, प्रबळ कष्ट आणि सातत्य असेल तर यश तुमचे आहे.
तसेच, ठाकूर अनुप सिंग यांनी ‘राष्ट्रीय पुरस्कार इन फील्ड ऑफ इंडियन सिनेमा’ प्राप्त करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल संवाद साधून मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी, रोहित रॉय आणि ठाकूर अनुप सिंग यांना सूर्यदत्त सूर्यगौरव राष्ष्ट्रीय पुरस्कार इन द फिल्ड ऑफ इंडियन सिनेमा हा मानाचा पुरस्कार सुर्यदत्तचे अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांसोबत आपल्या स्वानुभवाचे कथन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना ‘समाजसेवा व शिक्षण’ पुरस्कारही प्रदान केला.
या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशांक गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शशांक गोरे यांनी आपल्या वक्तव्यातून छत्रपती संभाजी महाराजांची दूरदृष्टी, चाणक्यनीती व धाडसीक वृत्ती किती असामान्य होती, हे स्पष्ट केले. त्यांनी डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.
हा संवादात्मक उपक्रम सुर्यदत्तच्या सर्वांगीण शिक्षण दृष्टिकोनाचे प्रतीक आहे, जिथे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक शिक्षणच नव्हे, तर वास्तविक उद्योगातील अनुभव देऊन त्यांचा व्यावसायिक विकास साधला जातो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तनकार डॉ श्वेता राठोड यांनी केले, तर अक्षित कुशल यांनी कार्यक्रमाची यशस्वी व्यवस्था सुनिश्चित केली. संस्थेच्या उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते आभार प्रदर्शन समारंभ संपन्न झाला.
