महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ‘अहिंसा परमो धर्म की जय’, ‘धर्माचा व्यापार बंद करा’, ‘धर्म विकायची किंवा खरेदी करण्याची वस्तू नाही’, ‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची जागा वाचवा’, ‘जैन मंदिर वाचवा’, ‘जब तक सूरज-चांद रहेगा, एचएनडी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी आज पुण्याचे वातावरण दुमदुमून गेले.
शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) जागा विक्रीच्या निर्णयाविरोधात चारही पंथातील जैन समाज एकत्र आला. ‘जैन बोर्डिंग बचाव कृती समिती’च्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चातून जैन समाजाने आपला तीव्र निषेध व्यक्त केला.
मॉडेल कॉलनीतील सार्वजनिक धर्मदाय ट्रस्ट अंतर्गत असलेल्या या जागेची विक्री काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे केल्याचा आरोप आहे. या विक्रीविरोधात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले जैन बांधव, भगिनी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी काळ्या फिती बांधून, निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले.
मोर्चाच्या अग्रभागी आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज, तीर्थेष ऋषिजी आणि माताजी महाराज हे मुनीगण उपस्थित होते. जैन बोर्डिंगपासून सुरुवात झालेला हा मोर्चा संचेती हॉस्पिटल, जुना बाजार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत नेण्यात आला. हजारो नागरिकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी अभय छाजेड, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि रवींद्र धंगेकर यांनी मोर्चाला भेट देत जैन समाजाच्या मागण्यांना पाठींबा दर्शविला. जैन समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ही 1958 साली स्थापन झालेली सार्वजनिक धर्मदाय संस्था असून, ट्रस्टकडे मॉडेल कॉलनीतील सुमारे 12 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे.
या जागेवर अनेक वर्षांपासून शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर अस्तित्वात आहे. काही व्यक्तींमार्फत विकसकांशी बेकायदेशीर व्यवहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. तरीही स्थानिक पातळीवर विकासकामांच्या नावाखाली हस्तक्षेप होत असल्याने जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
जैन समाजाने पुढे मागणी केली आहे की ८ ऑक्टोबर २०२५ रोजीचा ट्रस्ट आणि विकसक यांच्यातील विक्री करार तसेच त्यानंतरचा कर्ज करार रद्द करण्यात यावा. तसेच वसतिगृहाची मालमत्ता व ट्रस्टची संपत्ती ही मूळ धर्मादाय उद्देशांसाठीच वापरली जावी.
या मोर्चात आनंद कांकरिया, स्वप्नील गंगवाल, ॲड. योगेश पांडे, ॲड. स्वप्नील बाफना, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, ॲड. जिंतूरकर, अक्षय जैन यांच्यासह युथ कार्यकर्ते आणि जैन बोर्डिंगचे विद्यमान व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, जैन बोर्डिंगच्या जमीनविक्रीप्रकरणी लक्ष्मीकांत खाबिया, ॲड. योगेश पांडे आणि आनंद कांकरिया यांनी गुरुवारी (दि. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबींचा आढावा घेत, वसतिगृह व मंदिराबाबत अन्याय होणार नाही आणि शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिल्याचे खाबिया यांनी सांगितले.















