उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : वसुबारस निमित्त श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोशाळा, बार्शी येथे भक्तिभावाने गोपूजन, आरती तसेच गोशाळेच्या नव्या लोगोचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे , तसेच बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थेचे ट्रस्टी प्रदीप बागमार यांनी सांगितले की, गोरक्षणामध्ये जनावरे तळ हातासारखी सांभाळली जातात. ही गोशाळा गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत आहे. जैन समाजासह इतर समाजही या कार्यात सहकार्य करत आहेत. येथे सुमारे २५०–३०० जनावरे आहेत.
ही सर्व जनावरे भाकड किंवा कत्तलखान्याकडे जाताना गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली जातात. काही जनावरे मृत अवस्थेत असतात, तर काही गंभीर जखमी अवस्थेत आढळतात आणि गोशाळेत पाठवली जातात.
गोरक्षणाचे उत्पन्न मुख्यतः शेणखतावर आधारित असते; बाकीचा खर्च समाजाच्या दातृत्वातून भागवला जातो. समाज आपल्या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, बैलपोळा, वसुबारस, नवीन व्यापाराची सुरुवात, नोकरी लागल्याचा आनंद किंवा पुण्यतिथी अशा प्रसंगी गोशाळेला मदत करतो. येथे विविध जातींच्या गायी आहेत.
मध्यंतरी कत्तलखान्याकडे जाताना तालुका पोलीस स्टेशनने पकडलेल्या ३० लहान खोंडांचे संगोपन गोशाळेत चालू आहे. काही खोंडांना पंधरा दिवसांपासून संस्थेचे ट्रस्टी संचालक युवक पवन श्रीश्रीमाळ यांनी बाटलीने दूध पाजून, चारा खाऊ घालून वाढवले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी पवन श्रीश्रीमाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन अध्यक्ष धन्यकुमार शहा यांनी मानले.
कार्यक्रमाला शहरातील जैन समाजासह विविध सामाजिक संस्था, नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी कार्यक्रमात अध्यक्ष धन्यकुमार शहा, संस्थेचे ट्रस्टी प्रदीप बागमार, संदीप सुराणा, गोविंद बाफना, पवन श्रीश्रीमाळ, निरव छेडा, तसेच गोशाळेचे सेवक बाळासाहेब ओहाळ, संतोष वागलगावे, सोमनाथ काजळे यांनी अथक परिश्रम घेतले.
“पांगरी, माढा, वैराग, बार्शी तालुका व शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस कर्मचारी स्थानिक युवा गोरक्षकांसह मिळून कत्तलीकडे जात असलेल्या जनावरांना पकडतात. हे गोरक्षक ती जनावरे पोलिसांच्या ताब्यात देतात आणि पोलिस ती सुरक्षितपणे श्री नवकार जैनसेवा गोशाळेकडे सुपूर्द करतात. ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. गोशाळा आणि पोलीस प्रशासन यांचे सहकार्य समाजातील युवकांना समाजसेवेस प्रोत्साहित करते. बार्शीतील युवक कोणत्याही संघटनेशी जोडलेले असून समाजहितासाठी कार्यरत आहेत, हेच शहराची खरी ताकद आहे.” – अशोक सायकर, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी
“गाय ही फक्त प्राणी नसून आपली जननी आहे. तिच्या माध्यमातून दूध, शेणखत, मूत्र, शेती आणि पर्यावरणाला लाभ होतो. गोमाता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणतेही सण असले तरी पोलीस अधिकारी व कर्मचारी सुट्ट्या घेत नाहीत; दिवाळीतही ते घरी जाऊ शकत नाहीत. पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री नवकार जैनसेवा गोशाळेत येऊन वसुबारसचे पूजन करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला. या दिवाळीची सुरुवात खूप खास झाली.” त्यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. – बालाजी कुकडे, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक















