लुटमारीच्या सलग घटना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्ता,अतिशय रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो, तो सध्या दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर लुटमारीच्या सलग घटना घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या दुचाकीस्वारांना थांबवून लुटण्यात आले. यापैकी एका व्यक्तीवर चाकूने हल्ला देखील करण्यात आला. या दोन्ही घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून, पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी गस्त वाढवली आहे. तसेच डीबी पथकाचे अधिकारीही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विशेष म्हणजे या घटना संध्याकाळी साधारणपणे 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास घडत आहेत. याच वेळी अनेक नोकरदार आपले काम आटोपून घरी परतत असतात, तसेच मार्केट यार्ड परिसरातील व्यापारी देखील या मार्गावरून प्रवास करत असतात. अशा वेळेस घडणाऱ्या या घटना नागरिकांसाठी अत्यंत चिंताजनक आहेत.
दिवाळीचा काळ सुरू असल्याने नागरिकांची ये-जा अधिक प्रमाणात होत असताना, पोलिसांसमोर हे आरोपी शोधणे हे मोठे आव्हान ठरत आहे. पुढील काही दिवसांत पोलिसांनी हे आरोपी किती तत्परतेने पकडले, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तोपर्यंत मात्र गंगाधाम शत्रुंजय मंदिर मार्गावरील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरलेलेच आहे.

















