पर्वती पोलिसांची कामगिरी : आरोपीवर दोनदा मोक्का कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर अटक केली.
अजय भागवत घाडगे (वय २४, रा. कचरावत चाळ, दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. अजय घाडगे याच्यावर यापूर्वी हडपसर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्या प्रकरणात त्याची गेल्या वर्षी जामिनावर सुटका झाली होती.
सुटकेनंतर त्याने पर्वती परिसरातील एका तरुणाशी मैत्री केली. त्यातून वाद निर्माण होऊन त्यांनी एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात अजयचे सात साथीदार आधीच अटकेत असून, त्यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अजय घाडगे हा त्यानंतर फरार होता.
दरम्यान, पोलीस अंमलदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की अजय घाडगे हा आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कात्रज येथे येणार आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने सापळा लावून त्याला अटक करण्यात यश मिळविले. या कारवाईचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अजय परमार करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस अंमलदार राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, नानासाहेब खाडे, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, स्वप्नील घुगे, मनोज बनसोड, अमित चिव्हे व कीर्ती भोसले यांनी केली.


















