हडपसरमधील अमेनोरा पार्क टाऊन परिसरातील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घराच्या मुख्य दरवाजावरील डिजिटल लॉक करून बाहेर गेलेल्या तरुण इंजिनिअरच्या घरात चोरट्यांनी शिरून तब्बल २६ लाख ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना हडपसर येथील अमेनोरा पार्क टाऊन परिसरात घडली.
याबाबत स्वप्निल शिंदे (वय ३३, रा. अॅसेंट टॉवर, अमेनोरा पार्क टाऊन, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्निल शिंदे हे मगरपट्टा येथील एका कंपनीत इंजिनिअर आहेत. त्यांनी आपल्या घराला अत्याधुनिक डिजिटल लॉक बसवले आहे.
शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी घराच्या दरवाजाला डिजिटल लॉक करून कुटुंबियांसह बाहेर पडले. रविवारी (दि. १२) दुपारी तीनच्या सुमारास ते परत घरी आले. यानंतर १७ ऑक्टोबर रोजी ते आपल्या गावी फलटणला जाण्याची तयारी करत असताना त्यांच्या आईने बेडरूममधील पलंगाखाली ठेवलेले दागिने पाहिले असता, तेथे ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी डिजिटल लॉक उघडून घरातील २६ लाख ६७ हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते.
घरातील डिजिटल लॉकचा पासवर्ड हा घरातील सदस्यांसह पूर्वी व सध्या काम करणाऱ्या चार व्यक्तींना माहिती असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करत आहेत.



















