महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री महावीर स्वामींच्या निर्वाण कल्याणक आणि श्री गौतम स्वामींच्या केवलज्ञान कल्याणक या पावन दिनानिमित्त कात्रज, पुणे येथील श्री आगमोद्धारक देवर्धि जैन आगम मंदिर ट्रस्ट तर्फे दोन दिवसीय दीपावली दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मंदिर परिसरातील श्री पावापुरी जलमंदिर (प्रतिकृती) येथे होणारा हा भव्य सोहळा यंदा २१व्या वर्षात पदार्पण करत असून, मंत्रमुग्ध करणारे दिवे, आकर्षक रोशनाई सजावट आणि सुमधुर भक्तिसंगीताचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळणार आहे.
सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत दीपोत्सव पार पडणार असून, मध्यरात्री १२ वाजता लाडू अपर्णाचा विशेष सोहळा होईल. त्यानंतर मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ७.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत भक्तिसंगीत आणि रोशनाईने मंदिर परिसर उजळून निघेल. पुणे व परिसरातील सर्व भाविकांना आपल्या परिवारासह या भक्तिपूर्ण वातावरणाचा लाभ घेण्याचे सादर आमंत्रण देण्यात आले आहे.
या वर्षीच्या कार्यक्रमाचे लाभार्थी कै. मोहनलालजी गुलाबचंदजी बाठिया परिवार (राजेंद्रकुमार मोहनलाल अँड कंपनी), मार्केटयार्ड, पुणे हे असून, उत्सवात बासरी, शहनाई, सितार आणि तबल्याच्या वाद्यवृंदाने सजलेले सुमधुर भक्तिसंगीत सादर केले जाणार आहे. या दिव्य सोहळ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन राजेंद्र बाठिया यांनी केले आहे.



















