सोसायटीच्या मोकळ्या जागेत डोक्यात वार करून निर्घृण खून
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : धानोरी येथील बी यु भंडारी ग्रीन क्रॉम्स सोसायटीच्या मोकळ्या जागेत एका महिलेच्या डोक्यात वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सेंट्रिंग काम करणाऱ्या कामगाराला अटक केली आहे.
खून झालेल्या महिलेचे नाव गीता विक्रम रेड्डी (वय ४५, रा. टिंगरे चाळ, धानोरी गावठाण) असे आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामध्यान महाबल चौहान (वय ३१, रा. बी यु भंडारी ग्रीन सोसायटी, धानोरी) असे आहे. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी यु भंडारी ग्रीन क्रॉम्स सोसायटीच्या मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, महिलेच्या डोक्यात वार करून तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, आरोपी रामध्यान चौहान हा त्या महिलेबरोबर घटनास्थळी दिसून आला. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
महिलेची ओळख पटली असली तरी तिचे नातेवाईक अद्याप पोलिसांच्या संपर्कात आलेले नाहीत. खून करण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक पद्धमराज गंफले पुढील तपास करीत आहेत.















