बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने शेलगाव येथे पारधी समाजासाठी दिवाळी स्नेहमेळावा आयोजित
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह आणि एकत्र येणं पण याच दिवाळीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलानं माणुसकीचा दीप प्रज्वलित करत समाजात एक वेगळीच दिवाळी साजरी केली.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ‘ऑपरेशन पहाट’ या संवेदनशील आणि समाजाभिमुख संकल्पने अंतर्गत, बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने मौजे शेलगाव (ता. बार्शी) येथे पारधी समाजासाठी दिवाळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पार पडला. या स्नेहमेळाव्यात पारधी समाजातील १८ कुटुंबांना गोड पदार्थांनी भरलेल्या शिधा-किट्सचे वाटप करण्यात आले. सुमारे ३० ते ३५ नागरिकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमाचं नेतृत्व सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी केवळ शिधा वाटपच केलं नाही, तर उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना आणि आरोग्य योजना याबद्दल उपयुक्त माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक सुधीर गुळमे, पोहेकॉ दशरथ बोबडे, सोमनाथ खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोंदर आणि युवराज गायकवाड यांच्यासह बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला.
‘ऑपरेशन पहाट’मुळे पोलिसांनी कायदा राखण्याबरोबरच समाजाशी जिव्हाळ्यानं नातं जोडत “संरक्षक ते सामाजिक आधार” असा एक नवा प्रवास सुरू केला आहे. पोलिसांनी दाखवलेली ही संवेदनशीलता म्हणजेच खऱ्या अर्थानं “माणुसकीची दिवाळी” ठरली आहे.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत करत, “पोलिसांनी दाखवलेली ही काळजी म्हणजेच खरी समाजसेवा,” अशा शब्दांत कौतुकाचा वर्षाव केला. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ‘ऑपरेशन पहाट’ या उपक्रमामुळे आज पोलिस समाजाचे खरे सोबती बनले आहेत आणि शेलगावातील पारधी समाजात दिवाळीचा खरा उजेड पोहोचला आहे.















