महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे/बार्शी : समाजसेवेची परंपरा कायम ठेवत समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था, पुणे तर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
भोसरी येथे झालेल्या संस्थेच्या बैठकीत बार्शी शहरातील सदस्य श्रीमती कविता खानापुरे यांनी बार्शी व माढा परिसरातील पूरस्थितीची माहिती देत शेतकरी पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी आवाहन केले. त्यांच्या या संवेदनशील आवाहनाला संस्थेच्या सर्व सदस्यांनी होकार देत तत्काळ मदत पाठविण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या वतीने 100 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, डाळ, साखर, तेल आणि चहा पत्ती यांसारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता. ही सर्व किट भोसरी येथून पाठवून माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पूरग्रस्तांना वितरित करण्यात आली.
किट वाटपाच्या वेळी माढा तालुक्यातील उंदरगावचे रहिवासी राजेश चव्हाण, तसेच गावाचे सरपंच आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत किट योग्य त्या ठिकाणी वाटण्यासाठी सहकार्य केले. संस्थेच्या संस्थापिका राजश्री ताई गागरे यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाबद्दल संवेदनशील राहणे हेच संस्थेचे ध्येय असून, संकटाच्या काळात मदतीचा हात देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”
या उपक्रमात संस्थेच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.
















