शाळकरी मुलगा ठरला टारगेट, सर्वसामान्यांचे डोळे उघडवणारी घटना : शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या एका शाळकरी मुलाला गेमिंग आयडी देण्याचे आमिष दाखवून साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोघा आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून मुलांना फसवणाऱ्या टोळ्यांपासून पालकांनी सावध राहावे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे मयूर उर्फ शशिकांत मुंजाजी भिसाड (वय २१, रा. परभणी) आणि किशोर डहाळे (वय २२, रा. परभणी) अशी आहेत. या प्रकरणी शाळकरी मुलाच्या वडिलांनी शिक्रापूर पोलिसांकडे फिर्याद दिली असून, ही माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा परिसरातील हा शाळकरी मुलगा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. आरोपी भिसाड याची मुलाशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्याने गेमिंग आयडी देतो, असे सांगून मुलाला जाळ्यात ओढले. त्यानंतर घरातून ५ तोळे सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त केले.
मुलाने घरातील दागिने काढून भिसाडला दिले. भिसाडने हे दागिने आपल्या साथीदार डहाळे याच्याकडे परभणीत दिले. आयडी दिल्यानंतर गेम सुरू न झाल्याने आरोपींनी मुलाकडे ५० हजार रुपये व आणखी दागिन्यांची खंडणी मागितली. याची माहिती मुलाच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नियुक्त केले. तांत्रिक तपासातून आरोपी भिसाड आणि मुलगा यांच्यात सोशल मीडियावर संपर्क असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी भिसाडला ताब्यात घेतल्यावर त्याने दागिने डहाळेला दिल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी डहाळेलाही अटक करून त्याच्याकडून २३ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ₹१.६२ लाख) जप्त केले.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, विनायक मोहिते आणि प्रताप कांबळे यांनी केली.
पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे : सुनील फुलारी
“शाळकरी मुले ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल वापरताना सोशल मीडियावर विविध आमिषांना बळी पडत आहेत. मुलांना मोबाईलचा वापर फक्त आवश्यक कामापुरताच करावा. ते कोणत्या वेबसाईट्स पाहतात, कोणाशी संपर्कात आहेत, यावर पालकांनी लक्ष ठेवावे. अशा प्रकारचे प्रकरण निदर्शनास आल्यास विलंब न करता पोलिसांकडे तक्रार करावी,” असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
















