मंदिरात पैसे दान करायचे असल्याची भामट्याने केली होती बतावणी : सिंहगड रोडवरील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नातेवाईक मयत झाले आहेत, मंदिरात पैसे दान करायचे आहेत, असे सांगून एका ७१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढायला लावून ती घेऊन भामटा पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या ७१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील ब्रम्हा हॉटेलशेजारी शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी जात होते.
त्यावेळी मोटारसायकलवरुन एक जण आला. त्याने माझे नातेवाईक मयत झाले आहेत. त्याकरीता मला मंदिरामध्ये ५ हजार रुपये दान करायचे आहेत. मी तुमच्याकडे ५ हजार रुपये देतो, ते तुम्ही मंदिराचे दानपेटीत टाका, असे म्हणून त्याने त्याचे जवळील पुजेच्या सामानाची प्लास्टिकची पिशवी फिर्यादीच्या हातात दिली. सध्या चोरीच्या घटना घडत आहेत.
तुम्ही हातातील सोन्याची अंगठी पिशवीत काढून ठेवा, असे त्याने सांगितले़ त्यामुळे त्यांनी उजव्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी या भामट्याने दिलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली. त्यावेळी या भामट्याने ५ हजार रुपये पिशवीत टाकण्याचा बहाणा करुन त्यांनी टाकलेली सोन्याची अंगठी हातचलाखी करुन काढून घेऊन तो पळून गेला. पोलीस हवालदार तारु अधिक तपास करीत आहेत.
हातचलाखीने ज्येष्ठाची सोन्याची चैन लांबवली
रस्त्याने पायी जात असलेल्या ज्येष्ठाच्या गळ्यातील सोनसाखळी हातचालाखीने दुचाकीवर आलेल्या दोघांनी लांबवली. याप्रकरणी पाषाण येथील ७० वर्षीय नागरिकाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पाषाण सुस रोडवरील फुटपाथवर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक फुटपाथवरून पायी जात असताना, दुचाकीवरून दोन जण त्यांच्याजवळ आले. एकाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत, ‘क्या अंकल किधर है, बहोत दिन हो गये मिले नही’ असे वक्तव्य केले. यावर ज्येष्ठाने ‘मै आपको जानता नही, आप कौन हो’ असे उत्तर दिले. त्यानंतर दुचाकीवर बसलेल्या दुसरा चोर खाली उतरून ज्येष्ठाच्या पाया पडला. त्याला देखील ज्येष्ठाने ‘मेरे क्यू पैर पड रहे हो, मै आपको जानता नही’ असे उत्तर दिले. त्यानंतर चोरांनी एक बिस्किटाचे पाकीट ज्येष्ठाच्या हातात देत तेथून जवळच असलेल्या एका मंदीरात दान करण्यास सांगितले. ज्येष्ठाने त्याला नकार देत, ‘मै नहीं करूंगा, तुम जाओ इधर से, आप ही मंदीर मे जाके दान करो’ असे उत्तर दिले. त्यानंतरही दोघा चोरट्यांनी ज्येष्ठाच्या हातात बिस्किटाचे पाकीट देत, ते सुतारवाडीच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, चोरांनी हातचलाखीने ज्येष्ठाच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची सोन्याची चैन चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
















