महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्याच्या गंगाधाम चौक, बिबवेवाडी परिसरातील बहीण-भाऊ अविस्मा आणि रिवान मरलेचा यांनी महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावून शहराचा गौरव वाढविला आहे.
अविस्मा उपेश मरलेचा हिने वय १२ ते १५ वयोगटात, तर तिचा भाऊ रिवान उपेश मरलेचा याने वय ८ ते १० वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक जिंकले. या दोन्ही बहीण-भावंडांनी यापूर्वीही जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन केले होते.
या बालकांना प्रफुल्ल चांदणे व अर्चना चांदणे यांनी शिवशंकर क्रीडा संकुल येथे प्रशिक्षण दिले. आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळण्याची इच्छा या बालक क्रीडापटूंनी व्यक्त केली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
















