दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला संगणक अभियंता गजाआड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी आणि खडकी परिसरात छापे टाकले होते. या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या त्या संगणक अभियंत्याला अखेर गजाआड करण्यात आले.
अटक झालेल्याचे नाव झुबेर हंगरगेकर (वय ३२, रा. कोंढवा) असे आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झुबेर हा मूळचा सोलापूरचा असून तो उच्चशिक्षित आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेला हा अभियंता काही काळापूर्वी चेन्नई येथे गेला होता. तिथून परत आल्यानंतर एटीएसने त्याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. यापूर्वी, ९ ऑक्टोबर रोजी एटीएसने पुण्यातील कोंढवा, वानवडी आणि खडकी परिसरात मोठी कारवाई करत १८ संशयितांना ताब्यात घेतले होते.
या कारवाईतून १९ लॅपटॉप, मोबाइल संच तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. जप्त केलेल्या उपकरणांमधील माहितीचे विश्लेषण करताना झुबेर हा एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे समोर आले.
२०२३ मध्ये पुण्यात अटक करण्यात आलेल्या आयसिस दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे आणि गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते. त्यांनी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणीही केली होती. तसेच, पुण्यातील कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे देखील निष्पन्न झाले होते.
साताऱ्यातील एका कपड्यांच्या दुकानात दरोडा टाकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली होती. महाराष्ट्रात आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करून तरुणांची दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचेही तपासात समोर आले.
दरम्यान, झुबेर हंगरगेकरला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या संगणकातून आणि घरातून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात तो ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो या संघटनेच्या संपर्कात कसा आला, याचा तपास सध्या सुरू आहे.
विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी झुबेरला पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मागणी मान्य करत झुबेरला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

















