मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून जेरबंद : ९ महिने होता फरार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आयटी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात तब्बल नऊ महिने फरार असलेला रुपेश मारणे याला पुणे पोलिसांनी मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका बंगल्यातून पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.
शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी गजा मारणे टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दिवशी गजा मारणे व त्याची टोळी चित्रपट पाहून कोथरुडकडे परत जात असताना मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी झाली.
या वादातून टोळीने जोग यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह अनेकांना अटक केली असून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर रुपेश मारणे हा फरार झाला होता. कोथरुड पोलीस व गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते.
अखेर पोलिसांना तो मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका मोठ्या बंगल्यात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पहाटेच्या सुमारास त्या बंगल्याला वेढा घालून कारवाई केली. सर्व बाजूंनी सज्ज झालेल्या पथकाने दरवाजा ठोठावला. एका महिलेने दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी आत शिरून रुपेश मारणे याला ताब्यात घेतले.
रुपेश मारणे हा गजानन मारणे टोळीतील एक प्रमुख सदस्य आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, व्यावसायिकाचे अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिकाचे अपहरण करून ४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन वर्षांपूर्वी गजा मारणे, रुपेश मारणे आणि इतर १५ जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळीही रुपेश मारणे अनेक महिने फरार होता आणि तेव्हाही त्याला मुळशी तालुक्यातूनच अटक करण्यात आली होती.

















