गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कारवाई : वाघोलीतील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाघोली परिसरात कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या आणि त्यानंतर तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराला पुन्हा शस्त्रासह शहरात परत येऊन वावरत असताना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य दीपक कांबळे (वय १९, रा. सिद्धिविनायक पार्क, ओव्हळवाडी रोड, वाघोली) असे आहे. मार्च २०२५ मध्ये पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी वाघोली परिसरात कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड करणाऱ्या चौघांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन घाडगे यांना माहिती मिळाली की, तडीपार गुंड आदित्य कांबळे हा रायसोनी कॉलेजलगतच्या मैदानात धारदार शस्त्र घेऊन थांबला आहे.
त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपीने काहीतरी लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार हत्यार आढळले. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, तसेच पोलीस अंमलदार सासारंग दळे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, गिरीश नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, नेहा तापकीर, नितीन घाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदले आणि सोनाली नरवडे यांनी सहभाग घेतला.

















