पती, सासू, दीर व नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घटस्फोटासाठी दबाव टाकण्यात आला. या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घरातील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती, सासू, दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव दिशा निलेश शहा (वय २५, रा. सोमजी हाइट्स, श्रद्धानगर, कोंढवा) असे आहे. याबाबत दिशा हिची आई हितश्री संदेश शहा (वय ५७) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती निलेश दिलीप शहा, सासू संगीता शहा, दीर प्रशांत शहा (तिघे रा. भुगाव) आणि नणंद ममता व्होरा (रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा हिचा विवाह २० डिसेंबर २०२४ रोजी जैन समाजातील रुढी-परंपरेनुसार निलेश शहा (वय ३०, रा. माऊंट ब्लेअर सोसायटी, भुगाव) याच्याशी झाला होता. निलेश शहा हा खासगी नोकरी करतो. लग्नानंतर त्याने दिशाला नोकरी सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला पतीसह सासू, दीर आणि नणंद यांनी विविध कारणांवरून त्रास देण्यास सुरुवात केली.
दिशाला “तु स्लो आहेस”, “तुला संसार जमत नाही”, “तुझे डोळे छोटे आहेत” अशा अपमानास्पद शब्दांत बोलून सतत छळले जात होते. तिला स्वयंपाक करायला लावून तिच्या हातचे अन्न कोणी खात नसे, असा मानसिक त्रास तिला सहन करावा लागत होता.
२९ सप्टेंबर २०२५ रोजी पती निलेश, सासू संगीता आणि नणंद ममता यांनी दिशाला माहेरी आणले. त्यावेळी ममता यांनी तिच्या आईला “दिशाचं लग्न का केलं?” असे विचारले, तर निलेशने “तीला संसार जमत नाही” असे म्हणत तिला माहेरी सोडून दिले.
दुसऱ्या दिवशी (२८ सप्टेंबर) निलेश आणि संगीता पुन्हा तिचे कपडे घेऊन आले आणि घटस्फोट घ्यायचा असल्याचे सांगितले. त्या दोघांनी दिशासोबत वाद घालून तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील दागिने जबरदस्तीने घेतले.
या सर्व प्रकारामुळे दिशा मानसिक तणावात होती. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे दीड वाजता तिची आई एटीएममधून पैसे काढण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. काही वेळात परत आल्यानंतर दिशाने हॉलमधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले.
धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर हितश्री शहा यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत.

















