७ गुन्हे उघडकीस, ७ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त : विश्रामबाग पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवाच्या गर्दीचा गैरफायदा घेत भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर अखेर जेरबंद केले. त्याच्याकडून सात गुन्ह्यांतील सुमारे ७० ग्रॅम वजनाचे, ७ लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव परशा ऊर्फ प्रशांत शिवराम शिंदे (वय २२, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, खुळेवाडी) असे आहे. गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरीला जाण्याच्या अनेक तक्रारी विश्रामबाग व फरासखाना पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झाल्या होत्या.
६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकात गणपतीचे दर्शन घेत असताना एका भाविकाच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची साखळी, ज्यात रुद्राक्ष ओवले होते, चोरीला गेली होती.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यावरून आरोपीचा फोटो तयार करून सर्वत्र पाठविण्यात आला. दरम्यान, पोलीस अंमलदार अमोल भोसले यांना माहिती मिळाली की, हा संशयित खुळेवाडी परिसरात राहतो. त्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याच्याकडून एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरी केलेले दागिने त्याने आपल्या परिचयातील एका व्यक्तीकडे ठेवून त्याच्याकडून पैसे घेतले होते. पोलिसांनी त्या व्यक्तीला देखील आरोपी केले असून, त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे व पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, अमोल भोसले, आशिष खरात, सागर मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात, नितीन बाबर, राहुल माळी, पठारे यांनी सहभाग घेतला.















