तैमूर मुलाणी यांची नियुक्ती, बाळासाहेब चव्हाण यांची बदली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 55 क्लास वन अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची बदली झालेली आहे.
त्यांच्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी यांची मुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद (जिल्हा सोलापूर) म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना महसूल विभाग, पुणे अंतर्गत पदस्थापना देण्यात आली आहे.
तर, बार्शी नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांची उपायुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका येथे बदली करण्यात आली असून त्यांना महसूल विभाग, कोकण–२ अंतर्गत पदस्थापना देण्यात आलेली आहे.
नगर विकास विभागाच्या या फेरबदलामुळे बार्शी नगरपरिषदेला नवीन नेतृत्व लाभणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदल्यांमुळे नगरपरिषदेच्या प्रशासनात नवीन ऊर्जा, कार्यक्षमता आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
0६ नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी नुतन मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्याकडे बार्शी नगरपरिषदेचा कार्यभार औपचारिकरीत्या सुपूर्द केला.
















