विनानंबर प्लेटची गाडी वापरत होता, तीन गुन्हे उघडकीस, ७० हजारांचा ऐवज जप्त : बंडगार्डन पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रेल्वे स्टेशन परिसरात पादचारयांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल चोरी आणि एक मोटारसायकल चोरी असे तीन गुन्हे उघडकीस आले असून, ७० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
अर्जुन हिराजी भोसले (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहरातील विविध ठिकाणी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटना अशी की, रविशंकर बंडप्पा खुबा (वय ३१, रा. कात्रज चौक) हे ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता पुणे रेल्वे स्टेशनसमोरील शिंदे वाहनतळाकडून कात्रज बसस्टॉपकडे जात होते. भावाला फोन करण्यासाठी त्यांनी खिशातून मोबाईल काढला, तेव्हाच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून बोल्हाई चौकाच्या दिशेने पलायन केले.
या घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपींनी विनानंबर प्लेटची दुचाकी वापरल्याचे आढळले. त्याच वर्णनाचा एक व्यक्ती विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवरून जाताना दिसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत समोर आले की, त्याच्याकडील मोटारसायकल राजगड पोलीस ठाण्यातून चोरीला गेली होती.
तपासात आणखी एका घटनेचा उलगडा झाला. हरीश रतनलाल पटेल (वय २०, रा. मोहननगर, धनकवडी) हे ३ नोव्हेंबर रोजी पहाटे स्वारगेट बसस्थानकाबाहेर मित्राला फोन करत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला होता.
स्वारगेट येथून मोबाईल हिसकावल्यानंतर आरोपी पुणे स्टेशन परिसरात आले आणि तिथे दुसरा मोबाईल हिसकावला. या दोन्ही चोरीच्या घटना आणि मोटारसायकल चोरी अशा एकूण तीन गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगीता आल्फासो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, निरीक्षक (गुन्हे) नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे आणि तुकाराम हिवाळे यांनी केली आहे.
















