भूम नगर परिषद निवडणुकीची धुरा संजय गाढवे यांच्या हाती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज झाली असून, या निवडणुकीची धुरा संजय गाढवे यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. शिवसेनेला भूम शहरासह ग्रामीण भागात प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याने या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा विश्वास माजी मंत्री व आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
ते भूम येथील साहिल फंक्शन हॉल येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलत होते. सावंत म्हणाले की, “संजय गाढवे यांच्या विरोधात एकत्र येणे गरजेचे आहे, कारण त्यांचा विजय म्हणजे शिवसैनिकांचा विजय आहे.
ठिकाण बदलणाऱ्यांवर विश्वास नाही, म्हणूनच भूमकर संजय गाढवे यांच्या पाठीशी उभे आहेत.ते पुढे म्हणाले, “माझ्याबाबत अफवा पसरवल्या गेल्या की मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज आहे. होय, मी नाराज आहे पण स्वतःसाठी नाही; माझ्या जिल्ह्यातील जनतेसाठी आहे.
मंत्रिपद जनतेसाठी हवे आहे आणि मंत्रीपद मिळाल्यावर मी प्रशासनात सुसूत्रता आणली.” विरोधकांवर टीका करत सावंत म्हणाले की, “राज्यात व केंद्रात सत्ता असूनही त्यांनी मतदारसंघात एकही ठोस काम केलेले नाही.
अतिवृष्टीच्या काळात मी फक्त पाहणी केली नाही, तर शेतकऱ्यांना मदत केली.” भूम शहरासाठी २४ तास काम करणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय गाढवे असल्याचे सांगत, सावंत म्हणाले की, “मी कार्यकर्त्यांसाठी जीवाचे रान करणारा, जमिनीवर पाय ठेवून काम करणारा शिवसैनिक आहे. नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वांनी ताकदीने मैदानात उतरावे.”
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, आण्णासाहेब देशमुख, आर. पी. आय. मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चना दराडे, तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, माजी जिप अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, युवा सेना तालुका प्रमुख नीलेश चव्हाण यांच्यासह शिवसेना व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















