पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४८ हजारांचा माल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : औंध–बाणेर लिंक रोडवरील शेतात अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या ‘फार्म कॅफे’ या हुक्का बारवर चतु:श्रृंगी पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ४८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिस अंमलदार वाघेश भीमराव कांबळे (वय ३२) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॅफे मालक अमित वाळके (रा. औंध), मॅनेजर बलभीम कोळी (रा. व्हाईट हाऊस हॉटेलजवळ, औंध–बाणेर लिंक रोड), कॅफे चालक विक्रम कुमार द्वारकाप्रसाद गुप्ता (वय २३), वेटर सुरज संजय वर्मा (वय २४) आणि राजकुमार चन्नू अहिरवाल (वय १९, रा. फार्म कॅफे, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील शेतजमिनीवर शेड टाकून फार्म कॅफे चालवण्यात येत होते. तेथे ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पिण्यासाठी दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, कॅफेमध्ये ५ ते ६ ग्राहकांना अवैधरित्या तंबाखूजन्य हुक्का पुरविला जात असल्याचे आढळले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध कंपनींचे तंबाखू फ्लेव्हर, २० काचेचे हुक्का पॉट आणि इतर साहित्य मिळून एकूण ४८ हजार ६५० रुपयांचा माल जप्त केला.
या कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे आणि पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे यांनी केले.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे आणि तुषार गिरंगे यांनी केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे करत आहेत.















