गुळ व्यापारातील समस्यांच्या निराकरणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे व महाराष्ट्रातील गुळ व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या दि. पुणे जॉगरी मर्चंटस् असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित सेटिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड एकमताने करण्यात आली.
या सभेत असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवडही पार पडली. उपाध्यक्षपदी अजित शहा, सचिवपदी श्रीकांत कलंत्री तर खजिनदारपदी शशांक हापसे यांची निवड सर्वानुमते झाली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून निखील मेहता, राजेंद्र गुगळे, जवाहरलाल बोथरा, मंगेश पारलेशा, विपुल ओसवाल, संपत भटेवरा आणि प्रविण गांधी यांची निवड करण्यात आली. आमंत्रित सदस्य म्हणून अभिनव पावेचा आणि कल्पेश जैन यांची निवड करण्यात आली.
गुळ व्यापाराशी संबंधित विविध समस्यांवर असोसिएशनने सातत्याने पुढाकार घेतला आहे. गुळावरील स्टॉक लिमिट, सेल्स टॅक्स, काळा गुळ व व्हॅट संदर्भातील आंदोलनांमध्ये संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
याशिवाय जीवनावश्यक खाद्यपदार्थांवरील व्हॅट, किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीविरोधात व्यापाऱ्यांचा आवाज बुलंद करण्याबरोबरच एल.बी.टी. आणि अन्न सुरक्षा कायद्यावरील प्रश्न तसेच बाजार आवारातील समस्यांबाबत पुना मर्चंटस् चेंबरच्या लढ्यात असोसिएशन व त्यांच्या सभासदांनी खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विरचंद बाफना यांच्या पुढाकाराने व अध्यक्षतेखाली दि. पूना मर्चंटस् चेंबरची स्थापना झाली होती. पुण्यातील गुळ-भुसार आणि जीवनावश्यक खाद्यपदार्थांचा व्यापार करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही संस्था आजही सातत्याने कार्यरत आहे.















