बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांचा खुलासा, बोपोडी, मुंढवा वेगवेगळे गुन्हे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमोडिया कंपनीने कोरेगाव पार्क भागातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवाणी आणि पार्थ पवार यांच्या अमोडिया कंपनीचा संबंध नसल्याचा खुलासा पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे. बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची पुणे पोलिसांकडून चौकशी येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणाच्या तपासात महसूल विभागतील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने पोलिसांनी महसूल विभागाकडून काही कागदपत्रे मागविली आहे. कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्य अमोडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणाशी संबंध नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले.
या दोन्ही प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले हे आरोपी आहेत. त्याअनुषंगाने तपास केला जाणार आहे. बोपोडीतील जमीन व्यवहाराची नोंदणी छत्रपती शिवाजी रस्त्यावरील तहसीलदार कायार्लायत झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार येवले यांनी संगनमत करून हा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात शासकीय चौकशी करण्यात अली असून, येवले यांना निलंबित करण्यात आले आहे.
बेकायदा आदेश आणि पत्र तयार करुन शासनााची फसवणूक केल्याप्रकरणी येवले यांच्यासह सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडक पोलीस ठाण्यात व्हिजन प्रॉपर्टीकडून कुलमुखत्यार धारक राजेंद्र रामचंद्र विद्वांस (रा. इंद्रा मेमरीज, सकाळनगर, बाणेर रस्ता), ऋषीकेश माधव विद्वांस, मंगल माधव विद्वांस, विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. इंदूर, मध्य प्रदेश), जयश्री संजय एकबोटे (रा. चित्रलेखा बिल्डींग, कुलाबा, मुंबई), हेमंत गवंडे (रा. सकाळनगर, बाणेर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















