इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि खजिनदार-शिपायावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षकांना अनुदान मान्यता देणाऱ्या आदेशात बदल करून शिपायासाठी शासनाचा बनावट आदेश तयार करण्यात आला आणि त्याद्वारे तब्बल १० वर्षे शासकीय अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवछत्रपती प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि शिपायावर ११ लाख २६ हजार ४३८ रुपयांचा वेतनस्वरूपात पैसा स्वीकारून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याबाबत उपशिक्षणाधिकारी छाया उदय महिंद्रकर (वय ५५) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड, मुख्याध्यापक दिलीप श्रीराम काळे, शिपाई व संस्थेचे खजिनदार नानासाहेब सोमनाथ मोहिते आणि तत्कालीन संस्थेचे सचिव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कोंढव्यातील इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवछत्रपती प्राथमिक-माध्यमिक विद्यालयात २०१५ पासून मार्च २०२५ पर्यंत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी छाया महिंद्रकर या जिल्हा परिषद माध्यमिक विभागात उपशिक्षणाधिकारी आहेत.
पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आणि त्यामधील अनुदानित तसेच विना-अनुदानित शाळांवर नियंत्रण व शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीची चौकशी छाया महिंद्रकर आणि प्रभारी उपशिक्षणाधिकारी भारती चव्हाण यांनी शाळेला भेट देऊन केली.
चौकशीत असे आढळले की शाळेला दोन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीच मान्यता मिळाली होती. मात्र त्या आदेशात बदल करून संस्थेचे खजिनदार नानासाहेब सोमनाथ मोहिते यांच्या नावाने शिपाई पदासाठी वैयक्तिक मान्यता आदेश तयार करण्यात आला.
शाळेस २० टक्के अनुदान प्राप्त झाले आणि त्यानुसार बँकेत खाते उघडण्यात आले. त्या खात्यात १ सप्टेंबर २०१६ ते मार्च २०२५ या कालावधीत ११ लाख २६ हजार ४३८ रुपये इतकी रक्कम वेतनाच्या स्वरूपात काढून शासनाची फसवणूक करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.















