गुन्हे शाखा युनिट २ ची आंबेगावात कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आंबेगाव येथील दळवीनगर परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ३ लाख ३० हजार ७२० रुपये किंमतीचे १६५ ग्रॅम अफिम जप्त केले आहे.
देविलाल शंकरलाल आहिर (वय ४३, रा. ग्रीन अलिव्हीम बिल्डिंग, दळवीनगर, कात्रज) असे या आरोपीचे नाव आहे. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी युनिट २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना गोपनीय माहिती मिळाली की दळवीनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती अफिमसारख्या अंमली पदार्थाची विक्री करत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पथकाने गोल्विग स्टार ब्युटी पार्लरसमोर कारवाई करून देविलाल आहिर याला पकडले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे १६५ ग्रॅम अफिम आढळले.
आरोपीविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तसेच अंमलदार जाधव, मोकाशी, टकले, पवार, राख, सरगर, योगेश मांढरे, नेवसे, ताम्हाणे, थोरात, दळवी, आबनावे, शेख, तांबोळी आदींनी केली.
कारवाईचा योगायोग
देविलाल आहिर हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही सप्टेंबर २०२४ मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याकडून ५६ लाख ९० हजार रुपये किंमतीचे २ किलो ८४५ ग्रॅम अफिम जप्त केले होते. त्यावेळीही पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांनाच बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. सध्या ते युनिट २ मध्ये कार्यरत असून, या कारवाईतही त्यांनाच गोपनीय माहिती मिळाल्याने आरोपी पुन्हा जेरबंद झाला.

















