गुन्हे शाखा युनिट ३ ची खडकवासला धरण परिसरात कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रेकॉर्डवरील आरोपी गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने खडकवासला धरण परिसरात कारवाई करत एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. गणेश सतिश रणखांब (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे या आरोपीचे नाव आहे.
१४ नोव्हेंबर रोजी कोथरुड व वारजे परिसरात गस्त घालत असताना, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आणि त्यांचे सहकारी यांना पोलीस हवालदार किशोर शिंदे व अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला यांच्यामार्फत बातमी मिळाली. त्यानुसार एनडीए-खडकवासला रोडलगत टी- पॉईंट चौकात सापळा रचण्यात आला. तेथे आलेल्या गणेश रणखांब याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या अंगझडतीमध्ये ४१ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीलाही उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, हवालदार किशोर शिंदे, मारुती पारधी, अमोल काटकर, कैलास निम्हण, मोहम्मद शेख तसेच अंमलदार तुषार किंद्रे व पुरुषोत्तम गुन्ला यांच्या पथकाने केली.
भाजी विक्रेता असला तरी ‘रेकॉर्डवरील गुन्हेगार’
गणेश रणखांब हा व्यवसायाने भाजी विक्रेता असला तरी त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१३ मध्ये कोथरुड परिसरात खुनाचा गुन्हा, तर २०१७ मध्ये खुनाचा प्रयत्न व हाणामारी असे तीन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तसेच डेक्कन जिमखाना येथील नदीपात्रातील चौपाटीवर एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी त्याच्यासह तिघांना अटक केली होती.

















