हिंजवडीत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई : चार जणांना अटक, २३ जणांवर गुन्हा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अमेरिकन नागरिकांना फोन करून औषध कंपन्यांविरोधात दावा दाखल केल्यास मोठी नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची वैयक्तिक माहिती मिळविण्यात येत होती. ही माहिती अमेरिकेतील एका लॉ फर्मला पुरवून डॉलरमध्ये कमिशन घेत असल्याचे उघड झाल्यानंतर हिंजवडीतील दोन बनावट कॉल सेंटरवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखा व गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत एकूण २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
स्काय हाय सोल्युशनचे मालक सागर कुमार यादव (३२, रा. हिंजवडी फेज २) आणि मॅनेजर आनंद पंकज सिन्हा (२८, रा. वाघोली) यांना अटक करण्यात आली. तसेच येथे काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील कर्मचारी विविध संगणकांवर ‘टेलिसीएमआय’, ‘डायलर’ आणि ‘पॉऊड’ या सॉफ्टवेअर्सचा वापर करून स्वतःला अमेरिकेतील ‘मेडिकल हेल्थ डिपार्टमेंट’चे अधिकारी असल्याचे भासवून फोन करत होते. राऊंडअप, झॅनटॅक, टाल्कम पावडर इत्यादी उत्पादनांच्या वापरामुळे कॅन्सर, ब्लड कॅन्सर, नॉन-हॉजकिन लिम्फोमा असे गंभीर आजार होतात, असे सांगून ते नागरिकांची माहिती मिळवत. ती माहिती पुढे अमेरिकेतील लॉ फर्मला पुरवली जात असे आणि त्याबदल्यात डॉलरमध्ये रक्कम मिळत असे.
याशिवाय ‘कम्युनिटी चॉइस फायनान्शियल’ कंपनीतून बोलत असल्याचे सांगून कर्ज मिळवून देण्याचे आमिषही ते दाखवत. त्या लिंकद्वारे नागरिकांचे बँक डिटेल्स, युजर आयडी, पासवर्ड घेऊन त्यांचा क्रेडिट स्कोअर खराब असल्याचे सांगत गिफ्ट व्हाऊचर व डॉलरमध्ये रक्कम उकळली जात होती. या ठिकाणाहून संगणक, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली.
दुसऱ्या छाप्यात टेक लॉ सोल्युशन या कॉल सेंटरचे मालक धनंजय साहेबराव कासार (२५, रा. माण, ता. मुळशी) आणि मॅनेजर हर्षद शंकर खामकर (२८, रा. हिंजवडी) यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींची चौकशी सुरू आहे.
या कॉल सेंटरमध्ये ‘बेलटॉक’ अॅप वापरून सुडो नावांनी अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधला जात असे. राऊंडअप, पॅराक्वॉट पेस्टीसाइड, टॅलकम पावडर, रोब्लॉक्स, सोलर पॅनल अशा उत्पादनांचा वापर केला आहे का, त्याचे साइड इफेक्ट झालेत का, असा तपशील विचारून नागरिकांची माहिती मिळवली जात होती.
ही माहिती अमेरिकेतील लॉ फर्मला पुरवून कमिशन मिळवले जात असल्याचे उघड झाले. येथूनही संगणक, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक अरविंद पवार, त्यांच्या पथकातील अंमलदार, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस आणि इतर कर्मचारी सहभागी होते.
सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजू मांडून आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवून दिली. छाप्यात एकूण २० हार्डडिस्क व ३ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

















