खडक पोलिसांनी ६ गुन्ह्यांचा छडा लावला : ट्रक, कार व दुचाकी जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : टिंबर मार्केट येथे पार्क केलेला ट्रक चोरुन नेणार्या सराईत चोरट्याला खडक पोलिसांनी ट्रकसह श्रीगोंदा जामखेड रोडवरील एका हॉटेलमधून जेरबंद केले तर त्याच्या साथीदाराला पुण्यातून अटक केली. त्यांच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तुषार संजय झांबरे (वय २९, रा. पीर साहेब वस्ती, हिंगणी, ता. आष्टी, जि. बीड) आणि त्याचा साथीदार शाहरुख राजू पठाण (वय २८, रा. विश्वराज हॉस्पिटल समोर, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून खडक पोलीस ठाण्यातील ट्रक चोरी, फरासखाना पोलीस ठाण्यातील अॅक्टिव्हा दुचाकी, समर्थ, लोणावळा शहर, सांगवी, विश्रांतवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेल्या फिर्यादी यांनी त्यांचा आयशर ट्रक टिंबर मार्केट येथे ३ नोव्हेंबर रोजी पार्क केला होता. चोरट्यांनी हा ट्रक चोरुन नेला. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक तपास केला. त्यात आरोपी हे बीड, अहिल्यानगर परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस हवालदार किरण ठवरे, पोलीस अंमलदार शुभम केदारी हे बीडकडे रवाना झाले. श्रीगोंदा – जामखेड रोडलगतच्या एका हॉटेलवर आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथून तुषार झांबरे याला चोरलेल्या ट्रकसह पकडले. यावेळी शाहरुख पठाण हा पळून गेला.
आर टी ओ नंबर बदलून ट्रक विकण्याच्या प्रयत्नात ते दोघे होते. पळून गेलेल्या शाहरुख याचा शोध घेत असता तो कारसह अहिल्यानगर येथून पुण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याला पुण्यातून कारसह ताब्यात घेतले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, अक्षयकुमार वाबळे, मयुर काळे, शोएब शेख, कृष्णा गायकवाड, निलेश् दिवटे, विश्वनाथ गोरे, शुभम केदारी, विकास पांडुळे, अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.

















