खडकी पोलिसांनी सिलेंडर चोरट्यांचे रॅकेट आणले उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खडकी परिसरातून गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. कर्मचारी वितरणासाठी सिलेंडर घेऊन गेले असताना बाहेर रस्त्यावरील टेम्पोमधून भरलेले गॅस सिलेंडर चोरीला जात होते. खडकी पोलिसांनी या गॅस सिलेंडर चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.
किरण लक्ष्मण जांभळे (वय ३७, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून २३ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. खडकी परिसरात गॅस सिलेंडर चोरणारी एक संघटित टोळी कार्यरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्याने ही बाब गांभीर्याने घेत कडक तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सुधाकर राठोड आणि गालीब मुल्ला यांनी तांत्रिक साधनांचा वापर करून संशयित हालचालींची नोंद मिळविली, तर ऋषिकेश दिघे यांनी महत्त्वाची गुप्त माहिती मिळविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम आणि उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकातील शशी संकपाळ, आबा केदारी, शशांक डोंगरे, अनिकेत भोसले, सुधाकर तागड आणि दिनेश भोये यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून किरण जांभळे याला पकडले. त्याच्या ताब्यातून लाखो रुपयांचे २३ भरलेले गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. चोरट्यांचे हे एक रॅकेट असून त्याच्याकडून आणखी चोरीचे गॅस सिलेंडर मिळण्याची शक्यता आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दाभाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

















