ब्लेडने वार करून पळून जाण्याचा प्रयत्न : प्रवाशांनी दिले फरासखाना पोलिसांकडे पकडून
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे मनपा ते दगडूशेठ हलवाई गणपती दरम्यान पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापून चोरण्याचा प्रयत्न फसला. त्या वेळी आरोपी महिलेनं ब्लेडने वार करून चालत्या बसमधून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील प्रवाशांनी तिला पकडून फरासखाना पोलिसांच्या हवाली केले.
अश्विनी अविनाश भोसले (वय २९, रा. गंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत चिखली (पिंपरी चिंचवड) येथील ५३ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महापालिका भवन येथून शिवाजी रोडकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या होत्या. बस शिवाजी रोडवरील वसंत चित्रपटगृहाजवळ आली असताना, त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या अश्विनी भोसले हिने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने तोडण्याचा प्रयत्न केला.
ही बाब तत्काळ फिर्यादींच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्यावर भोसले हिने ब्लेडने त्यांच्या हातावर वार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र बसमधील प्रवाशांनी तत्परता दाखवत अश्विनी भोसलेला पकडून ठेवले.
ही महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पीएमपी बस प्रवाशांचे दागिने चोरण्याचे आणखी काही गुन्हे तिने केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.
















