काळेपडळ पोलिसांची कामगिरी : विरोधी टोळीच्या हल्ल्याच्या भीतीने बाळगली शस्त्रे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विरोधी टोळीतील गुंड बदला घेण्यासाठी हल्ला करतील या भीतीने मध्य प्रदेशातून शस्त्रे आणून ती बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ४२ हजार रुपये किंमतीची ४ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
आशिफ सबीरखान तेली (वय २१, रा. सय्यदनगर, हडपसर), यश सुभाष मदने (वय २०, रा. भीमरत्ननगर, कसबा, बारामती) आणि प्रथमेश संदीप लोंढे (वय २४, रा. वडगाव निंबाळकर, निरा रोड, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी आपापल्या भागात कोबिंग ऑपरेशन राबवून अवैध धंदे, तडीपार आरोपी, शस्त्र बाळगणारे आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि दाऊद सय्यद यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आशिफ शेख हा आपल्या दोन साथीदारांसह महंमदवाडी पालखी रोड परिसरात थांबला असून त्यांच्याकडे शस्त्रे असण्याची शक्यता आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस पथक हेवन पार्क आणि लक्ष्मी पार्ककडे जाणाऱ्या मधल्या कच्च्या रस्त्यावर गेले असता तेथे तिघे जण थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरून ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान त्यांच्या ताब्यात ४ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
काळेपडळ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, संजय बागल, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी आणि महादेव शिंदे यांनी केली.
आरोपी सराईत गुन्हेगार
काळेपडळ पोलिसांनी पकडलेले हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. प्रथमेश लोंढे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. यश मदने याच्यावर मारामारीचा गुन्हा आहे. मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्याचे काम आशिफ तेली याच्याकडे होते. प्रथमेश लोंढे याच्यावर यापूर्वीही खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. विरोधी टोळीतील गुंड आपल्यावर हल्ला करतील अशी भीती त्यांना वाटत असल्याने त्यांनी पिस्तुले जवळ बाळगल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
















