नगराध्यक्ष पदासाठी ९ : नगरसेवक पदासाठी ८४ अर्ज दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. १७) दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नगरसेवक पदासाठी तब्बल ८४ उमेदवारांनी अर्ज सादर केले. आलमप्रभू शहर विकास आघाडीकडील उमेदवारांनी ग्रामदैवत आलमप्रभूचे दर्शन घेऊन, आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत आणि माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, धनाजीराव थोरात व बाळासाहेब क्षिरसागर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अर्ज दाखल करण्यात आले.
अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान नगरपरिषदेमध्ये उमेदवारासोबत केवळ दोन व्यक्तींनाच प्रवेश देण्याच्या नियमामुळे बाहेर थांबलेल्या नेते मंडळी व पोलिस प्रशासनामध्ये काही काळ किरकोळ वादंगाची परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही आघाड्यांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.
काही प्रभागांमध्ये एकाच पक्षाकडून एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने पक्षांतर्गत नाराजीची शक्यता असून पुढील चार दिवसांत कोणाचे अर्ज कायम राहतील हे निश्चित होणार आहे. सध्याच्या घडामोडींवरून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दुरंगी लढत होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून नगरपरिषदेसमोरील तसेच मागील बाजूची दुकाने दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचा एक दिवसाचा व्यवसाय बंद राहिल्याने त्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.
नगराध्यक्ष साठी अर्ज
गाढवे संयोगिता संजय
गाढवे संयोगिता संजय
गाढवे अमृता अंगदराव
गाढवे प्रगती तानाजी
मस्कर मीरा आबासाहेब
प्राजक्ता आर्यनराजे शिंदे
पोळ ज्योती बंडू
थोरात सत्वशीला धनाजीराव
साबळे देवशाला
















