4250 किमी प्रवास 16 दिवसांत पूर्ण : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पहिले यश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : हवालदार अमृत रोहिदास खेडकर यांनी भारत सरकारच्या युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मंत्रालय, फिट इंडिया मूव्हमेंट आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कश्मीर ते कन्याकुमारी (4250 किमी) सायकल रॅली यशस्वीरीत्या पूर्ण करत सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा इतिहास रचला आहे.
1 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत झालेल्या या भव्य रॅलीत देशभरातील 150 सहभागींपैकी फक्त 107 जणांनीच हा कठीण प्रवास पूर्ण केला. त्यात हवालदार अमृत खेडकर यांनी केवळ 16 दिवसांत हे आव्हान पूर्ण करत दमदार वेग, जिद्द आणि चिकाटीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातून ही रॅली पूर्ण करणारे ते पहिलेच पोलिस कर्मचारी ठरले असून, संपूर्ण जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब मानली जात आहे. यापूर्वीही खेडकर यांनी गोवा येथील आंतरराष्ट्रीय Ironman स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
बार्शी सायकलिंग क्लब आणि बार्शी रनिंग क्लब यांनी या मोहिमेत दिलेले मार्गदर्शन विशेष ठरले.या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, माढा पोलीस स्टेशनचे प्रभारी नेताजी बंडगर तसेच अधिकारी–कर्मचार्यांनी खेडकर यांचे अभिनंदन केले आहे.
अमृत खेडकर यांच्या कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्याचा अभिमान उंचावला असून युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
















