कर्मचार्यांना मारहाण झाल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा इशारा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गेल्या आठवड्याभरात पेट्रोल पंप कर्मचार्यांना मारहाणीच्या तीन घटना घडल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुण्यातील पेट्रोल पंप सायंकाळी ७ नंतर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात भैरोबा नाला, पुलगेट आणि येरवडा येथील पेट्रोल पंपांवरील कर्मचार्यांना मारहाणीचे प्रकार झाले आहेत.याबाबत पेट्रोल डीलर्स असोसिएशनने एक निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे.
पेट्रोल हे अत्यावश्यक वस्तूंत मोडत असल्याने पेट्रोल पंपचालकांना संप करता येत नाही. त्यामुळे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने निर्णय घेतला आहे की, सायंकाळी ७ नंतर पंप न चालवण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे दोषींवर कारवाई करतील आणि आम्हाला पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ येऊ देणार नाही, असा विश्वास अली दारुवाला यांनी व्यक्त केला.
















