महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन 70.3’ ट्रायथलॉन स्पर्धेत बार्शीतील चार खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत ‘हाफ आयर्नमॅन’ हा मानाचा किताब मिळवला. माणिक हजारे, अमोल ताकभाते, प्रकाश फुरडे आणि डॉ. नवदीप लोकरे यांनी निर्धारित वेळेच्या आत ७०.३ मैलांचे अंतर पार करत हा बहुमान प्राप्त केला.
‘आयर्नमॅन’ ही जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी एक. या स्पर्धेसाठी खेळाडू दीर्घकाळ कठोर तयारी करतात. स्पर्धकांनी ११३ किमीचे एकूण अंतर १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे हे ८ तास ३० मिनिटांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते. प्रत्येक घटक वेळेत पूर्ण केल्यासच पुढील घटकासाठी पात्रता मिळते. त्यामुळे ही स्पर्धा खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक ताकदीचीही कसोटी पाहणारी आहे.
रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी पणजी येथील मिरामार बीचवर या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ३० देशांतील तब्बल १,६०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले. बार्शीतील चारही खेळाडूंनीही आपली उपस्थिती नोंदवली.
स्पर्धेत माणिक हजारे यांनी ७ तास १८ मिनिटे १२ सेकंदात, अमोल ताकभाते यांनी ७:२५:३१, प्रकाश फुरडे यांनी ७:३२:५६ तर डॉ. नवदीप लोकरे यांनी ८:१०:०२ वेळेत स्पर्धा पूर्ण करून ‘हाफ आयर्नमॅन’ होण्याचा मान मिळवला.
बार्शी रनर्स असोसिएशन, बार्शी सायकलिंग क्लब आणि मॉर्निंग क्लब बार्शी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी बार्शीतील महावीर कदम, अजित मिरगणे आणि अमृत खेडकर यांनीही हा किताब मिळवला आहे.
हि स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी स्विमिंग कोच बाळराजे पिंगळे, सहकार्य टिम रविप्रकाश बजाज , बाळासाहेब डेमरे, रणजीत पाटील, काळे व मोरे यांचे सहकार्य लाभले
















