दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई : महिलेचा विनयभंग केल्याचाही गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सातारा शहरातील यडाई देवी मंदिराजवळ एका तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावून खंडणी मागून जखमी करून खिशातील ३० हजार रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेलेल्या गुन्हेगारांपैकी एकाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पुण्यात जेरबंद केले आहे.
निखील अशोक काळे (वय २२, रा. मातंग वस्ती, कोडोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत रणजित नवनाथ कसबे (वय ३०, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी ८ नोव्हेंबर रोजी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना सातारा शहर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
रणजित कसबे हे ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता येडाई मंदिरात आरतीसाठी गेले होते. आरती सुरू होण्यापूर्वी मंदिराजवळ लल्लन जाधव, निखिल काळे, वाढीव व त्यांच्या ७ ते ८ साथीदारांसह आले. लल्लन जाधव याने कसबे यांना धमकावत म्हटले, “मी फरारी आहे.
मला खर्चासाठी आत्ताच्या आत्ता ५० हजार रुपये दे, नाहीतर मी तुला मारून टाकीन.” पैसे देण्यास नकार दिल्यावर जाधव याने त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावले. त्यानंतर गळ्यातील सोन्याची चैन ओढून तोडली व अर्धी चैन काढून घेतली. सर्व आरोपींनी कसबे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि खिशातील ३० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
वाढीव नावाच्या तरुणाने चाकू त्यांच्या चेहऱ्याकडे फिरवला. तो त्यांच्या डाव्या डोळ्याखाली लागून त्यांना दुखापत झाली. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दरोडा व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच निखिल काळे याच्यावर त्याच्या अगोदर दोन दिवस ६ नोव्हेंबर रोजी एका महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा गुन्हाही दाखल होता.
गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार बाळू गायकवाड व साईकुमार कारके हे पेट्रोलिंग करत असताना कारके यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सातारा येथील फरार गुन्हेगार स्वारगेट एस.टी. बसस्टँड परिसरात संशयितरित्या फिरत आहे.
या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कावडे व पोलीस अंमलदारांनी स्वारगेट बसस्टँड परिसरात जाऊन शोध घेऊन निखिल काळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन्ही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पुढील कारवाईसाठी त्याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कावडे, पोलीस अंमलदार बाळू गायकवाड, साईकुमार कारके, महेश पाटील, अमित गद्रे, नारायण बनकर, रिहाना शेख व साधना पवार यांनी केली आहे.
















