नंतर कचर्यात मृतदेह टाकून देणार्या बापलेकाला अटक : विमानतळ पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : येरवडा येथील नवी खडकी परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सुवर्णा (वय ४०) हिचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरातच ठेवून २–३ दिवसानंतर दुर्गंधी पसरू लागल्यावर आरोपीने रात्री रिक्षातून मृतदेह लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीजवळील कचराकुंडीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून बापलेकांना अटक केली आहे.
रवि रमेश साबळे (वय ३५) आणि रमेश रामचंद्र साबळे (वय ६५, दोघे रा. नवी खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुवर्णा (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
लोहगाव-वाघोली रोडवरील स्मशानभूमीजवळील गुरुद्वारा कॉलनीच्या बाहेरील कचराकुंडीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी सकाळी विमानतळ पोलिसांना आढळला. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व पोलीस अंमलदारांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयास्पद रिक्षा दिसून आली.
सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमानतळ पोलिस पथक येरवडा येथील यशवंतनगरात पोहोचले. तेथून आरोपीच्या घरी जाऊन रवी साबळे याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सांगितले की, सुवर्णाला “तुझ्याशी लग्न करतो” असे सांगून तो पुणे स्टेशन परिसरातून तिला नवी खडकी येथील घरात घेऊन आला होता. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
किरकोळ कारणावरून त्यांच्या भांडणांना सुरुवात झाली होती. १५ नोव्हेंबर रोजी त्याने सुवर्णाला लाकडी दांडे आणि विटेने मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह २–३ दिवस घरातच ठेवला. दुर्गंधी पसरू लागल्याने १८ नोव्हेंबर रोजी पहाटे वडिलांच्या मदतीने रिक्षातून मृतदेह गुरुद्वारा कॉलनीतील कचराकुंडीत टाकून दिल्याचे त्याने कबूल केले.
हा प्रकार येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येरवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार उमेश धेंडे, योगेश थोपटे, हरीप्रसाद पुंडे, ज्ञानेश्वर आवारी, लाळू कर्हे, गणेश इथापे, रुपेश पिसाळ, दादासाहेब बर्डे, पांडुरंग म्हस्के, राहुल जोशी, अंबादास चव्हाण, सागर कासार, अंकुश जोगदंडे, शैलेश नाईक, शंकर वाघुले, सचिन जगदाळे, बबलू भिसे यांनी केली आहे.
















