मुंढवा पोलिसांनी हडपसर रेल्वे स्टेशन परिसरातून केला १ लाखांचा नायलॉन मांजा जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना पकडून मुंढवा पोलिसांनी १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
आयुष राहुल शिंदे (वय २०, रा. शिंदे निवास, ससाणेनगर, हडपसर) आणि यशराज विजय दिवेकर (वय २०, रा. हिंगणे मळा, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.संक्रांत जवळ आली की अनेकांना पतंग उडविण्याचे वेध लागतात.
पक्ष्यांच्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने अनेक पक्षी जखमी होतात. नायलॉन मांजामुळे अपघात होऊन काही जणांचा जीवही गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. असे असतानाही अनेक जण नायलॉन मांजाची विक्री करताना दिसून येतात. पोलिसांनी अगोदरच अशा विक्रेत्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शिवाजी जाधव आणि पोलीस अंमलदार योगेश राऊत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर रेल्वे परिसरात दोघे तरुण नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत.
त्यानुसार पोलीस पथकाने परिसरात शोध घेऊन नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ८ हजार ८०० रुपयांचे ‘मोनोफिल गोल्ड’ कंपनीचे नायलॉन मांज्याचे रिल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोलीस हवालदार शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश राऊत, रुपेश तोडेकर आणि स्वप्निल रासकर यांनी केली आहे.















