मालधक्का रोडवर बंडगार्डन पोलिसांनी चौघांना केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीतील चौघांना बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे.
जानमोहम्मद नसरुद्दीन शेख (वय ३२, रा. पीर वस्ती, वडकी, सासवड रस्ता), सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३५), खुट्टाराज अंजीलप्पा विभुती (वय १९) आणि शिवप्रकाश कुमार (वय २३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चौपाट्या ऊर्फ राजेश मंगल मंडल हा पळून गेलेला आहे. त्यांना पकडण्यापूर्वी या चोरट्यांनी एका प्रवाशाला धमकावून हाताने मारहाण करून खिशातील १५५० रुपये जबरदस्तीने चोरून नेले होते.
याबाबत पोलीस अंमलदार शरद गायकवाड यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख, शिरोळे, विभुती, मंडल आणि कुमार हे फिरस्ते असून पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट परिसरात त्यांचा वावर असतो. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडील मोबाइल आणि रोकड हिसकावण्याचे गुन्हे त्यांनी केले आहेत.
पुणे स्टेशन येथील मालधक्का रस्त्यावर चोरट्यांची टोळी थांबली असून, प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे, मिरची पूड, दोरी, मोबाइल असा ३० हजार ६६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर, धीरज गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
या अगोदर या टोळीने एकाला लुटले होते. केतन रमेश वर्पे (वय ३७, रा. शांतीनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केतन वर्पे हे टुरिस्ट गाड्या भरण्याचे काम करतात. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता ते पुणे स्टेशनकडून मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असताना या टोळक्याने त्यांच्या खिशात हात घालून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना हाताने मारहाण करून खिशातील १५५० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली.















