२१ पिस्तुलांसह मोठा दारुगोळा जप्त : ५० भट्ट्या नष्ट, ड्रोनचा वापर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली १०५ जणांच्या पथकाने मध्यप्रदेशातील उमरटी गावातील बेकायदा शस्त्र कारखान्यांवर पहाटे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या संयुक्त कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून २१ पिस्तुले आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. तसेच शस्त्रे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ५० भट्ट्या घटनास्थळीच नष्ट करण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांमध्ये शहरात २१ पिस्तुले जप्त करण्यात आली होती. त्यात विमानतळ पोलीस ठाणे – ११, काळेपडळ – ४, खंडणीविरोधी पथक १ – २, खंडणीविरोधी पथक २ – ३ आणि युनिट ३ – १ असे एकूण २१ शस्त्रे जप्त झाली होती.
विमानतळ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांत ही सर्व शस्त्रे मध्यप्रदेशातील उमरटी गावातून पुरवली जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या शस्त्रपुरवठ्याचा मुळावर घाव घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
कारवाईसाठी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठे पथक तयार करण्यात आले. यात गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, परिमंडळ ४ मधील अधिकारी, २० सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, परिमंडळ ४ व गुन्हे शाखेचे ५० जवान, पोलीस मुख्यालयातील गॅस गन विभाग, तसेच शहर पोलिसांचे वायरलेस व सीसीटीव्ही पथक सहभागी होते.
कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा शस्त्रास्त्रांसह स्पेशल क्विक रिस्पॉन्स टीमही तैनात करण्यात आली होती. मोहीमेच्या यशस्वितेसाठी मोबाईल सर्व्हेलन्स, वाहने, तात्पुरते वायरलेस नेटवर्क, बुलेटप्रूफ जॅकेट आणि बॉडीवॉर्न कॅमेरे यांसारखी आवश्यक तांत्रिक साधने वापरण्यात आली.
गावाजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी प्रथम ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी पहाटे अचानक गावावर छापा टाकून बेकायदा शस्त्रनिर्मिती करणाऱ्या ५० घरांमध्ये झडती घेण्यात आली. तेथील पिस्तुले तयार करण्याचे साहित्य, सुटे भाग जप्त करण्यात आले आणि धातू तापविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भट्ट्या नष्ट करण्यात आल्या.
या ठिकाणी ‘उमरटी शिकलगार आर्म्स’ या नावाने मोठ्या प्रमाणावर शस्त्रनिर्मिती करून तस्करीचे रॅकेट उभे करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या गावातून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगडपर्यंत बेकायदा शस्त्रपुरवठा केला जात असल्याचेही समोर आले आहे.
दुसऱ्या राज्यात जाऊन पुणे पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अजूनही कारवाई सुरू असून ताब्यातील ३६ जणांची चौकशी सुरू आहे. ज्यांची या रॅकेटमध्ये महत्वपूर्ण भूमिका आढळेल, त्यांच्यावर पुढील कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, मदन कांबळे, कल्याणी कासोदे, तसेच पोलीस अंमलदार पठाण, देशमुख, काशिनाथ कारखेले, नितीन मुंढे, पवार, तांबेकर, रोकडे, रणपिसे, माने, खरात, पानसरे या पथकाने पुण्यातून ५०० किमी अंतर पार करून ही कारवाई यशस्वी केली.
















