गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाची कारवाई : पूर्ववैमनस्यातून हॉटेल कामगाराच्या डोक्यात बाटली मारून केला होता हल्ला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तडीपार असताना कात्रज येथील तणिष्क रेस्टो बारमधील हॉटेल कामगाराच्या डोक्यात दारूची बाटली फेकून जखमी करणाऱ्या आणि त्यानंतर फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
रामदास बबन कचरे (वय २३, रा. वेगरे, पो. कोळावडे, ता. मुळशी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. रामदास कचरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून हिंजवडी आणि पौड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
चांदणी चौक परिसरात कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी त्याला दोन अल्पवयीन साथीदारांसह पकडले होते. त्यांच्याकडून एकूण ६ गुन्हे उघडकीस आले होते. तसेच १ लाख १८ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सागर विठ्ठल जानकर (वय २३, रा. वेल्हा) यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्याद दिली होती. सागर जानकर हे कात्रज येथील तणिष्क रेस्टो बारमध्ये काऊंटरवर कामाला आहेत.
त्यांच्या गावाकडील यश ढेबे व विश्वनाथ ढेबे, लक्ष्मण कचरे आणि इतरांनी फिर्यादीचा लहान भाऊ रोहित याला एकमेकांचा धक्का लागल्याच्या कारणावरून ६ महिन्यांपूर्वी लग्नसमारंभात भांडण केले होते. त्या वेळी सागर जानकर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता; तेव्हा त्यांनी सागर यांनाही मारण्याची धमकी दिली होती.
७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता सागर बारमध्ये असताना यश ढेबे व इतर तेथे आले. त्यांनी काऊंटरजवळील काचेवर कोयत्याने वार करून काच फोडली. काऊंटरवरील दारूची बाटली फेकून मारली आणि ती सागर यांच्या डोक्याला लागली.
त्यांना आडविण्यासाठी गेलेले बारमधील राजेंद्र ढेबे यांना एका अनोळखी युवकाने हातातील कोयत्याने मारून जखमी केले होते. या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यातील काही जणांना अटक केली; मात्र रामदास कचरे हा फरार होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक २३ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की फरार गुन्हेगार रामदास कचरे हा वारजे पुलाजवळ आला आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथक वारजे पुलाजवळ पोहोचले. टेहळणी केल्यावर उत्तम चहाच्या दुकानाजवळ रामदास कचरे आढळून आला.
चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, पोलीस अंमलदार अमोल काटकर, मारुती पारधी, कैलास निम्हण, तुषार किंद्रे यांनी केली आहे.
















