पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चतु:श्रृंगी, हिंजवडी, वाकड परिसरात जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
औदुंबर ऊर्फ मोन्या रवींद्र नाकते (वय 29, रा. गोपाळ कृष्ण विकास मंडळासमोर, जनवाडी, गोखलेनगर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. औदुंबर नाकते याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी, हिंजवडी, वाकड पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
मागील 5 वर्षांत त्याच्याविरुद्ध 6 गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाची पडताळणी करून औदुंबर नाकते याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्ष स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सचिन कारंडे, पोलीस अंमलदार जाधव, पालांडे, ठोसर, बडे, वाघवले, मोमीन, दांगडे, गिरंगे, शिर्के यांनी केली आहे.
















