निरोगी तरुणाई, सुदृढ जीवनशैली आणि सकारात्मक संस्कारांचा संदेश
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आजच्या डिजिटल युगात तरुण मुलांमध्ये ऊर्जा, उत्साह आणि क्षमता विपुल प्रमाणात असली तरीही नियमित व्यायामाची सवय अनेकदा दुर्लक्षित राहते. या पार्श्वभूमीवर सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स फिटनेस अकॅडमी तर्फे फिटनेसचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीची प्रेरणा निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सूर्यदत्तमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य मार्गदर्शनाला विशेष महत्त्व दिले जाते. सायकलिंग, वॉकिंग, रनिंग, ट्रेकिंग यांसारख्या नैसर्गिक तंदुरुस्ती वाढवणाऱ्या क्रियाकलापांपासून ते विविध क्रीडा प्रकारांपर्यंत विद्यार्थ्यांना सक्रिय ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.
नियमित शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक प्रसन्नतेचा समतोल साधण्यासाठी सूर्यदत्तमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार उपक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. विद्यार्थ्यांनी फिटनेस हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारावा यासाठी संस्थेमार्फत सायकलेथॉन, मॅरेथॉन, खेळाचे वेगवेगळे प्रकार तसेच आरोग्य शिबीर नियमितपणे आयोजित केली जातात.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये फक्त तंदुरुस्तीची जाणीवच निर्माण होत नाही, तर सहकार्यभाव आणि सकारात्मक जीवनशैली या मूल्यांचेही संवर्धन होते. सूर्यदत्तची ही सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक फिटनेस संस्कृती विद्यार्थ्यांना निरोगी, उत्साही आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व घडविण्यास मदत करते.
या कार्यक्रमात फिटनेस क्षेत्रातील प्रेरणादायी रोल मॉडेल्स राजकुमार सुराणा, दीपक तोशनीवाल आणि बाळ कुलकर्णी यांचा सूर्यदत्ततर्फे सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी हे मान्यवर विशेष प्रेरणादायी ठरले.
या प्रसंगी बोलताना दीपक तोशनीवाल (बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की, “आतापर्यंत मी ९० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे आणि हे केवळ एका कारणामुळे शक्य झाले, मी स्वतःला नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतो.
शरीर सुदृढ असेल तर आपण समाजासाठी अधिक कार्य करू शकतो.” कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास यशाची चव फिकी पडते. फिटनेस ही फक्त सवय नसून, ती जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. जो स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, तो समाजाकडेही अधिक सकारात्मक, संवेदनशील आणि जबाबदार दृष्टीने पाहू शकतो.
बाळ कुलकर्णी (डेलकॉन्स स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स) यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील अत्यंत सोपी पण परिणामकारक आरोग्यसूत्रे सांगितली. ते म्हणाले की, “अभ्यासाचा किंवा कामाचा ताण असला, वेळ जुळला नाही तरी धावणे आणि चालणे या दोन साध्या सवयी कोणत्याही वेळी, कुठेही आणि आपल्या सोयीनुसार करता येतात.
यासाठी महागडी साधने, विशेष प्रशिक्षण किंवा व्यायामशाळेची गरज नसते, सातत्य हीच खरी गुरुकिल्ली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “यशाच्या दिशेने वाटचाल करताना जबाबदाऱ्या वाढत जातात, आणि त्या समर्थपणे पार पाडण्यासाठी मजबूत आरोग्य अत्यावश्यक असते.
आरोग्य हा जीवनाचा पाया असून विद्यार्थ्यांनी करिअरबरोबर तंदुरुस्तीला तेवढेच महत्त्व दिले पाहिजे.” राजकुमार सुराणा (जयपाल प्रिंटिंग प्रेस) म्हणाले की, “फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने ज्ञान तर वाढते, परंतु दीर्घकालीन यशासाठी शरीराची तंदुरुस्ती तेवढीच आवश्यक आहे.
म्हणूनच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडाविषयक आवड जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे. काही वेळा व्यायाम करण्यास कंटाळा येतो, अशा वेळी खेळ हा उत्तम पर्याय ठरतो. खेळातून मिळणारा आनंद, उत्साह, टीम स्पिरिट आणि शिस्त तंदुरुस्तीला अधिक नैसर्गिक व आनंददायी बनवतात.” त्यांनी पुढे सांगितले की, “फिटनेस म्हणजे फक्त व्यायाम नव्हे, तर एक संपूर्ण जीवनशैली आहे.
फिटनेस ही आत्मशिस्त निर्माण करणारी सवय असून ती व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवते.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले.
तीनही प्रमुख पाहुण्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना स्वअनुशासनाचे, तंदुरुस्तीचे आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधिक स्पष्टपणे समजले.
त्यांच्या सोप्या, व्यवहार्य मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आनंदी आणि तंदुरुस्त राहण्याची तसेच सातत्याने आरोग्याची काळजी घेण्याची प्रेरणा मिळाली. या सर्व प्रेरणादायी विचारांचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय सकारात्मक बदल दिसून आला असून त्यांनी आरोग्याविषयी सजगता, उत्साह आणि सक्रियता मनापासून स्वीकारली.
अभ्यास किंवा काम यातून प्रगती नक्की होते; पण त्या प्रगतीचा आनंद उपभोगण्यासाठी शरीर तंदुरुस्त आणि मन शांत असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण काय करायला हवे हे सगळ्यांनाच माहिती असते, पण ते सातत्याने करणे आणि इतरांनाही प्रेरित करणे हीच खरी आणि अर्थपूर्ण जीवनशैली आहे. यावेळी त्यांनी सूर्यदत्तमध्ये ‘Learning by Doing’ सोबतच ‘Living by Being Fit’ ही संस्कृती अधिक दृढपणे रुजवण्याचा संकल्प व्यक्त करत विद्यार्थ्यांना आरोग्यपूर्ण, सक्रिय आणि संतुलित जीवन जगण्याचे आवाहन केले. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
बाह्य सौंदर्यासोबतच आपले आतील आरोग्य उत्तम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या दिनचर्येत थोडासा वेळ स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे. – सुषमा चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
















